नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. भारत जर पाकिस्तानमध्ये होणार्या आशिया चषक स्पर्धेसाठी आला नाही तर आम्ही देखील भारतात होणार्या वन डे विश्वचषकाबाबत लवकरच स्पष्ट भूमिका घेणार असल्याचे सेठी यांनी म्हटले. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुढील बैठकीत हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले.
नजम सेठी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, "आमच्यासमोर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत पण जेव्हा मी एसीसी आणि आयसीसीच्या बैठकीला जाईन तेव्हा मला सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील. मात्र, आता भारताला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. आशिया चषकासाठी आपला संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, जर भारतीय संघ आशिया चषकासाठी आमच्या देशाचा दौरा करणार नसेल, तर पाकिस्तानलाही भारतात विश्वचषक न खेळवण्याचा विचार करावा लागेल, यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठाम आहे."
PCBचा BCCIवर निशाणा "मी माझे पर्याय खुले ठेवले आहेत कारण सर्व संघ पाकिस्तानात येत आहेत. सुरक्षेबाबत त्यांना कोणतीही अडचण नसताना भारताला सुरक्षेची चिंता का वाटत आहे. मी आगामी बैठकांमध्ये हे सांगेन की, भारताला पाकिस्तानातील सुरेक्षेची चिंता असेल तर आमच्या संघाला देखील भारतातील विश्वचषकादरम्यान सुरक्षेची काळजी आहे. ICC मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि कार्यकारी मंडळाची या महिन्यात बैठक होत आहे", अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयवर टीकास्त्र सोडले.
2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात आयसीसीसोबत होणाऱ्या बैठकीला सेठी आणि पीसीबीचे प्रतिनिधीत्व करणारे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आम्ही भारताच्या या भूमिकेला समर्थन देत नाही कारण आम्हाला आशिया चषक आयोजित करायचा आहे आणि लक्षात ठेवा की ते फक्त आशिया चषक आणि विश्वचषकाबद्दल नाही तर ते पाकिस्तानमध्ये 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल देखील आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी या विषयावर पाकिस्तान सरकारचे मत जाणून घेण्यासाची इच्छुक असल्याचे सेठी यांनी अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"