Join us

PCBचे BCCI समोर लोटांगण! आशिया कप पाकिस्तानातच पण...; पाक संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार 

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ च्या यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात वाद रंगला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 19:17 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ च्या (Asia Cup 2023) यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद रंगला होता. अखेर आज या वादावर अधिकृतरित्या तोडगा निघाल्याचे समजते. कारण भारताने ठेवलेल्या अटीनुसार आशिया चषकातील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होणार असून पाकिस्तानात होणार नाहीत. शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी (Nazam Sethi) यांनी याबाबत माहिती दिली. खरं तर आशिया चषक २०२३ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते. 

नजम सेठी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हटले, "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला त्यांचे आशिया चषकातील सामने तटस्थ ठिकाणी खेळावेत, तर पाकिस्तान आणि इतर संघ पाकिस्तानमध्ये खेळतील असा प्रस्ताव दिला आहे.  हा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने आशिया चषकाचे सामने घरच्या मैदानावर आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडे आमचा हा प्रस्ताव आहे."

पाकिस्तानी संघ भारतात येणार तसेच आता पाकिस्तानने भारताची बाजू ऐकून आशिया चषकातील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी झाले तर कदाचित भारतीय संघ २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल असे आम्हाला सांगण्यात आले असल्याचे सेठी यांनी म्हटले. याशिवाय पाकिस्तानने मवाळ भूमिका घेत भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सेठी यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील जनतेमध्ये भावना आहे की त्यांनी भारतासोबत समान पातळीवर क्रिकेट सामने खेळले पाहिजेत.

जनतेसाठी घेतली मवाळ भूमिका - सेठी "आमच्या सरकारने भारताविरुद्ध खेळण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. पण मी आत्ताच सांगू शकतो की जनतेचा मूड आहे, आम्ही गरजू नाही आणि आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो आणि आम्हाला भारतासोबत सन्मानाने क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत वाटाघाटीही करत आहोत", असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानएशिया कप 2022बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघआयसीसी आंतरखंडीय चषक
Open in App