नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिर (mohammad amir) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दिले आहेत. खरं तर फिक्सिंग केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीदेखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी हे आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे यासाठी आग्रही आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान बोर्डाच्या निवडकर्त्यांनी आमिरला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. तसेच वादाला तोंड फुटेल अशी विधाने टाळण्यास सांगितले आहे. मोहम्मद आमिरची क्रिकेट कारकिर्द वादग्रस्त राहिली. मोहम्मद आमिरला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. मॅच फिक्सिंगनंतर मोहम्मद आमिरला 2010 मध्ये 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर मोहम्मद आमिरवर 2010 ते 2015 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. मोहम्मद आमिर जेव्हा स्पॉट-फिक्सिंगच्या वादात अडकला होता, तेव्हा तो केवळ 18 वर्षांचा होता. मात्र, मोहम्मद आमिरने 2016 साली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
नजम सेठी यांनी दिले संकेतदरम्यान, 17 डिसेंबर 2020 रोजी मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आताच्या घडीला आमिर केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला हवे असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे. "मोहम्मद आमिर निवृत्तीची घोषणा मागे घेऊन पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. मी नेहमीच मॅच फिक्सिंगच्या विरोधात राहिलो आहे. पण आमिरने आपल्या चुकीची शिक्षा भोगली आहे म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले पाहिजे", असे नजम सेठी यांनी सांगितले. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निवडकर्ते हरून राशिद यांनी देखील सेठी यांच्या विधानाला दुजारा देत आमिरने वादग्रस्त विधाने टाळून निवृत्ती मागे घ्यायला हवी असे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"