No India-Pakistan Bilateral Series । नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेत असतो. हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार म्हटलं की क्रिकेट विश्वात एकच उत्सुकता असते. खरं तर हे दोन्हीही संघ सध्या केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषकात आमनेसामने येतात. आगामी २०२३चा आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे, त्यावरून देखील वादंग सुरू आहे. भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हायला हवी असे मत व्यक्त केले. सेठी यांनी कसोटी मालिकेसाठी तीन तटस्थ ठिकाणांची नावे देखील सांगितली आहेत.
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सेठी यांनी म्हटले, "होय, मला वाटते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका या देशात द्विपक्षीय कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. परंतु इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश यासाठी अधिक योग्य ठरू शकतात." आता पाकिस्तानने सुचवलेल्या पर्यायावर बीसीसीआयने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
'विराट' वादानंतर चाहत्यांकडून 'कोहली-कोहली'चे नारे; अफगाणी खेळाडूची प्रतिक्रिया Viral
BCCIनं चर्चेचा दिला पूर्णविराम पाकिस्तानने सुचवला पर्याय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फेटाळला असून दोन्ही देशांमध्ये भविष्यात द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. "भविष्यात किंवा आगामी काळात अशा प्रकारची मालिका होण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेसाठी तयार नाही", अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली.
'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक दशकापूर्वी शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा अर्थात २०१२-१३ मध्ये पाकिस्तानी संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. दोन्हीही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. दोन कट्टर प्रतिस्पर्धी दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत.