India vs Pakistan - भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सुरू आहे, परंतु दोन्ही देश एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. आता दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच भाग घेतात. २०१२-१३ मध्ये भारत आणि पाकिस्तानने शेवटची मालिका खेळली होती. पाकिस्तानचा संघ दोन ट्वेंटी-२० आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आले होते. भारत आणि पाकिस्तान २००७ पर्यंत एकमेकांशी खेळत होते. पण २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध संपवले आणि आता १५ वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये एकही मालिका झालेली नाही.
या सगळ्यात वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) प्रमुख झाका अश्रफ यांनी बीसीसीआयला प्रस्ताव दिला आहे. जका अश्रफ यांनी म्हटले आहे की, भारताची इच्छा असल्यास दोन्ही देशांमध्ये गांधी-जिना ट्रॉफी खेळवण्यात येऊ शकते. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना या दोघांनीही देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. पुढे जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि भारतापासून वेगळे झाले.
पीसीबी प्रमुखांनी अलीकडेच प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना भारताला शत्रू देश म्हणून संबोधले होते. पाकिस्तानने भारताच्या भूमीवर आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पण आता ते पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील मालिकेच्या प्रस्तावामुळे चर्चेत आले आहेत. झाका म्हणाले की, भारत हा पाकिस्तानसारखा मोठा क्रिकेट देश आहे. आणि मी भारताला नेहमी सांगतो की भारत-पाकिस्तानपेक्षा जगात कोणताही मोठा सामना नाही. जेव्हा हे दोन संघ खेळत असतात तेव्हा अॅशेस किंवा इतर कोणतीही मालिका त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. खरे तर मी भारताला गांधी-जिना ट्रॉफी ठेवण्यास सांगितले होते. ही मालिका एकदा भारतात आणि एकदा पाकिस्तानात झाली पाहिजे.
आशिया कप २०२३ मध्ये यावेळी भारत आणि पाकिस्तान याआधी दोनदा भिडले आहेत. या काळात भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला होता. पण याहीपेक्षा मोठा सामना या ऑक्टोबरमध्ये होणार आहे जेव्हा दोन्ही संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडतील.