Ramiz Raja, Pakistan Cricket Board: भारतात होणाऱ्या आगामी वन डे क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनी काही दिवसांपूर्वी भारताला डिवचण्यासाठी एक विधान केले होते. पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळण्यासाठी आलाच नाही तर तुमचा खेळ कोण बघणार, अशा आशयाचे ते विधान होते. यावरून अनेक वादविवाद निर्माण झाले. पण या वादाचा फटका आता खुद्द रमीझ राजांनाच बसणार असल्याची चिन्हं आहेत. PCB मध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि अध्यक्ष रमीझ राजांचे पद जाऊ शकते आणि त्याजागी माजी अध्यक्ष नजम सेठी पुन्हा अध्यक्ष बनू शकतात, असा पाकिस्तानी मीडियाने दावा केला आहे. त्यामुळे आता रमीझ राजा हे पीसीबीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर फार काळ बसू शकणार नाहीत अशी चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानी वाहिनी जिओ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नजम सेठी हे पीसीबीच्या नवीन अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही तसे संकेत दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नजम सेठी यांनी शनिवारीच लाहोरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली.
सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आदेश!
सूत्रांनी सांगितले की, 'PCBची २०१४ ची घटना पुन्हा संकलित करावी. त्यानंतरच विभागीय खेळांना संजीवनी मिळेल. आंतर-प्रांतीय समन्वय मंत्रालयाच्या सचिवांनी (IPC) अध्यक्ष बदलण्याबाबतचे आदेशही पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत. म्हणजेच आता यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.
रमीझ राजांवर इम्रान खान यांचा होता वरदहस्त
रमीझ राजा गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्येच पीसीबीचे अध्यक्ष झाले. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते. इम्रान हा १९९२ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आहे. इम्राननेच रमीझकडे ही जबाबदारी सोपवली होती. मात्र नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानचा खराब संघ निवडल्याबद्दल रमीझ राजावर जोरदार टीका झाली.
रमीझ राजांनी भारताला डिवचलं...
रमीझ राजा यांनी आपल्या वक्तव्याने भारतीय संघाला खुले आव्हान दिले होते. खरे तर पुढच्या वर्षी आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे. याबाबत BCCIचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावर रमीझ राजांना राग आला आणि त्यांनी धमकीही दिली की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही, तर पुढच्या वर्षीच्या वन डे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानही भारतात जाणार नाही. पण त्यांचे हे विधान त्यांच्यावर शेकणार असल्याची चिन्हे आहेत.
Web Title: Pakistan Cricket Board Ramiz Raja will be kicked out Najam Sethi to replace PCB board chief new chairman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.