जमैका, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-२० (३-०) आणि वन डे मालिका (२-०) खिशात घातली आहे. भारतीय संघ आता कसोटी मालिकेच्या तयारीसाठी लागला आहे. पण, संघावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. पाकिस्तान बोर्डला तसा मेल आला आहे आणि त्यांनी याची कल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) दिली आहे. मात्र आयसीसी आणि बीसीसीआय यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
टीम इंडियाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घेतली जात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की," धमकीच्या मेलबाबत आम्ही सुरक्षा यंत्रणेला कळवले आहे आणि खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे."
जम्मू काश्मीरचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभुमीवर दहशतवाद्यांनी टीम इंडियाला लक्ष्य केल्याची चर्च आहे. पाकिस्तानातील जीओ टिव्हीनं दावा केला की, पाकिस्तान बोर्डला या संदर्भातला मेल आला आहे आणि त्यांनी आयसीसी व बीसीसीआयला कळवले आहे. पण, बीसीसीआयकडून अद्याप कोणताही रिस्पॉंस मिळालेला नाही.