वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद सुरू झाला आहे. बाबर आझमच्या कर्णधारपदावर माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू युनूस खान, मोहम्मद हाफीज, वहाब रियाझ आणि सोहेल तन्वीर यांनी आज लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांची भेट घेतली. तसेच खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानची नवीन निवड समिती २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान कसोटी संघाबद्दल चर्चा करणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अश्रफ एका नवीन मुख्य निवडकर्त्याच्या शोधात आहेत, ज्याला समकालीन क्रिकेटच्या मागण्यांची पूर्ण माहिती आहे. खरं तर माजी खेळाडू युनूस खान, मोहम्मद हाफीज पाकिस्तानच्या मुख्य निवड समितीच्या दावेदारांमध्ये आहेत. इंझमाम-उल-हकचा मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, माजी कसोटीपटू तौसीफ अहमदने ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यासाठी संघ निवडण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, पीसीबीने आता हंगामी मुख्य निवडकर्ता तौसीफ अहमदच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानी संघ वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी १९ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्तानला केवळ एकदा २००९ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकता आला आहे. युनूस खानच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी ही किमया साधली होती.