PCB vs BCCI, Pakistan vs India: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) अधिकृतपणे आव्हान दिले आहे. 'बीसीसीआय'चे सचिव जय शाह म्हणाले होते की, पुढील वर्षी IPL चा कालावधी हा अडीच महिने असेल. यासाठी 'आयसीसी'च्या फ्युचर टूर प्रोग्राम्स (FTP) मध्येही अडीच महिन्यांची विंडो असेल. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शाह यांच्या या योजनेला ICC मध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. PCB चे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले, "आतापर्यंत IPL ची विंडो वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील ICC परिषदेत मी याबाबत माझे म्हणणे मांडेन."
'BCCIच्या निर्णयाला आव्हान देणार'
"मी स्पष्टच सांगतो की जागतिक क्रिकेटमध्ये जर विकास होत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की आपण छोट्याशा प्रमाणात पण मर्यादित आहोत. IPL सारख्या देशाच्या लीग स्पर्धेला इतका मोठा कालावधी दिल्यास ते योग्य ठरणार नाही. आम्ही या निर्णयाला आव्हान देऊ. येत्या काळात आम्ही याबाबत 'आयसीसी'कडे आमचं मत मांडू आणि या निर्णयालाच आव्हान देऊ", असे रमीझ राजा म्हणाले.
IPLच्या आगामी कार्यक्रमावर म्हणाले होते जय शाह?
ICC च्या पुढील FTPमध्ये IPL साठी अडीच महिन्यांची विंडो असेल, असे जय शाह यांनी अलीकडेच सांगितले होते. "IPL हा एक पैलू आहे ज्यावर आम्ही काम केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पुढील ICC FTP कॅलेंडरपासून, IPL मध्ये अडीच महिन्यांची अधिकृत विंडो असेल, जेणेकरून सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होऊ शकतील. आम्ही विविध मंडळांशी तसेच आयसीसीशी चर्चा केली आहे", असे जय शाह यांनी स्पष्ट केले होते.
रमीझ राजा भारत-पाकिस्तान सामन्यावर म्हणाले...
PCB चे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघ टीम इंडियासोबत क्रिकेट खेळण्यास उत्सुक असल्याची कबुली दिली. "मी या प्रकरणी सौरव गांगुलीशीही बोललो आहे. त्याला सांगितले की, सध्या तीन माजी क्रिकेटपटू त्यांच्या देशाचे क्रिकेट बोर्ड सांभाळत आहेत. अशा वेळी खेळ आणि राजकारण वेगळं ठेवून माजी क्रिकेटपटूंनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना जर हे संबंध सुधारता येत नसतील तर मग कोण करणार? यानंतर गांगुलीने मला दोनदा IPL फायनलसाठी आमंत्रित केले होते. पण मला काही कारणांमुळे जाता आले नाही", असेही रमीझ राजा म्हणाले.