Babar Azam, Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याची तुलना नेहमी विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ अशा महान फलंदाजांशी केली जाते. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनाही त्याचा फार अभिमान वाटतो. पण हाच बाबर आझम सध्या एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. बाबर आझमने नुकतीच एक मोठी चूक केली, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याला चांगलंच फटकारलं. इतकंच नव्हे तर त्याच्या या चुकीमुळे त्याला चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. त्याने नक्की असं केलं तरी काय... जाणून घेऊया
बाबर आझमकडे सध्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद आहे. पाकिस्तानचा संघदेखील इतर संघांप्रमाणेच टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बाबर आझम स्वत: रोज नेट्समध्ये सराव करत असतो. पण यावेळी नेमकं त्याने आपल्या धाकट्या भावाला नेट प्रॅक्टिससाठी लाहोरमध्ये आणलं होतं. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट झाल्यानंतर बाबरला टीकेला सामोरं जावं लागलं. या फोटोमध्ये त्याचा भाऊ सफिर नेट्समध्ये सराव करताना दिसला. ज्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज डहानी त्याला गोलंदाजी करताना दिसला. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला नियमांची व धोरणांची आठवण करून दिली.
पाहा व्हिडीओ-
कुटुंबातील सदस्य, मित्रांना आणण्यास मनाई आहे!
सफिरच्या सोशल मीडिया पोस्टने मोठा वाद निर्माण झाला. कारण PCB च्या हाय परफॉर्मन्स सेंटर (HPC) धोरणांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, केवळ पाकिस्तानी खेळाडू, प्रथम श्रेणी किंवा कनिष्ठ क्रिकेटपटूच अधिकाऱ्यांच्या परवानगीने केंद्रातील सुविधांचा वापर करू शकतात. पीसीबीच्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, बाबर तीन-चार दिवसांपूर्वी त्याच्या भावासह ट्रेनिंग सेंटरमध्ये आला होता. त्याच्या भावाने नंतर नेटमध्येही सराव केला.
PCB च्या सूत्रांनी सांगितलं की यानंतर बाबर आझमला ताकीद देण्यात आली. पाकिस्तानमधील कोणत्याही खेळाडूला त्याच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना सरावासाठी आणण्याची परवानगी नाही. त्यामुळे बाबरला त्याची चूक दाखवून देण्यात आली आहे. तसेच, अशी चूक परत करू नकोस अशी समजही देण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर त्याने चूक मान्य केली असून दिलगिरी व्यक्त केली.