पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानच्या शतकी खेळीमुळे शेजारी अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहेत. शनिवारी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. सामन्यात पावसाची बॅटिंग झाली अन् पाकिस्तानला सुखद धक्का बसला. न्यूझीलंडने ४०० पार धावसंख्या करून पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर (४०१) उभारला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून फखर झमानने ८१ चेंडूत १२६ धावांची नाबाद खेळी केली. फखरच्या या खेळीमुळे आणि पावसाने व्यत्यय आणल्यामुळे शेजाऱ्यांनी डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा २१ धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. पाकिस्तानची इज्जत राखणाऱ्या फखर झमानला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बक्षिस जाहीर केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. खरं तर फखर झमानला १० लाख रूपयांचे बक्षिस मिळणार आहे. सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी फखर झमानशी संवाद साधला. यासोबतच झमानला १० लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. झमानने ८ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने ८१ चेंडूत नाबाद १२६ धावा केल्या.
वन डे विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानी संघाने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर शेजाऱ्यांना सलग चार सामने गमवावे लागले होते. तेव्हापासून संघावर चहूबाजूंनी टीका होत आहे. संघाची गोलंदाजी, फिटनेस आणि बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, बाबर आझमच्या संघाने बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव करून पुनरागमन केल्याचे दिसते.
पाकिस्तानचा २१ धावांनी विजय
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने शेजाऱ्यांची पळता भुई थोडी केली. किवींनी निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ४०१ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला पहिला झटका लवकर बसला. मात्र, त्यानंतर फखर झमानने स्फोटक फलंदाजी केली आणि त्याला बाबर आझमची दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली. फखरने अवघ्या ६३ चेंडूत शतक झळकावले. विश्वचषकाच्या इतिहासातील हे पाकिस्तानी खेळाडूचे सर्वात वेगवान शतक आहे. पावसामुळे सामना थांबवावा लागला. शेवटचा सामना थांबला तेव्हा पाकिस्तानने एक बाद २०० धावा केल्या होत्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान बरोबरीच्या धावसंख्येच्या तुलनेत पुढे होता. यानंतर पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही आणि शेजाऱ्यांनी २१ धावांनी विजय मिळाला.
Web Title: pakistan cricket broad announced a prize of Rs 1 million for Fakhar Zaman for his outstanding performance against new zealand in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.