T20 विश्वचषक 2022 संपला. पाकिस्तानी संघाला अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम फेरीत खराब कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानी संघावर बरीच टीका झाली होती. दरम्यान, आता पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी माजी क्रिकेटपटू कामरान अकमलला नोटीस पाठवली आहे. कामरान अकमल आजकाल एक YouTube चॅनल चालवतो. तिथे तो खेळावर आणि खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा करतो. अकमलच्या एका वक्तव्यामुळे रमीज राजा संतापले आणि PCBकडून अकमलवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रमीझ राजाने कामरान अकमलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. रमीझ राजाने अकमलच्या कोणत्या टिप्पणीसाठी ही पाठवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु PCB कार्यालयाने ही नोटीस पाठवली आहे. त्यासोबतच असेही सांगितले जात आहे की रमीझ राजा इतर अनेक माजी क्रिकेटपटूंना देखील नोटीस पाठवू शकतो, जे त्यांचे यूट्यूब चॅनेल चालवत आहेत आणि सतत खेळाबाबत मर्यादा सोडून टिप्पणी करत आहेत.
रमीझ राजाच्या निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार, वारंवार वक्तव्ये करणाऱ्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपली मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानी क्रिकेटबाबत 'यूट्यूब'वर वक्तव्य करणाऱ्यांवर पीसीबीकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आजकाल त्यांचे स्वतःचे YouTube चॅनेल चालवतात. त्यात शोएब अख्तर, कामरान अकमल, सलमान बट, इंझमाम-उल-हक यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. हे सारे रमीझ राजा आणि PCBच्या 'हिटलिस्ट'वर आहेत.
विशेष म्हणजे 2022 च्या T20 विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तानसाठी चांगली झाली नाही. त्यांना भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर पाकिस्तानी संघाने कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली आश्चर्यकारक कामगिरी केली. सलग विजय मिळवून पाकिस्तानने फायनलमध्ये प्रवेश केला. पण अखेर त्यांना इंग्लंडविरूद्ध फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.