Ramiz Raja vs Babar Azam, Pakistan Cricket: पाकिस्तान संघाला त्यांच्याच घरात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने कसोटी मालिकेत ३-०ने त्यांना क्लीन स्वीप केले. कसोटी इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा पाकिस्तानचा त्यांच्याच घरात असा पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मावळते अध्यक्ष रमीझ राजा आणि संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यात चांगलीच जुपली. नक्की काय घडलं पाहूया.
बाबर आझम-रमीझ राजा यांच्यात जुंपली!
इंग्लंडच्या बॅझबॉल खेळाने प्रभावित झालेल्या रमीझ राजाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तेही बाबर आझमला टी२० खेळाडूंनाच कसोटीत खेळवण्याचा सल्ला देतील, जेणेकरून कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी आणि खेळ आक्रमक होईल. पण रमीझ राजाची ही गोष्ट पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला सांगितली असता त्याने पत्रकार परिषदेतच रमीझ राजा यांचा जाहीरपणे विरोध केला. कोणत्याही संघातील सर्व बदल हे एका आठवड्यात किंवा एका दिवसात करता येत नाहीत. यासाठी काही वेळ जाऊ दिला पाहिजे. कराचीतील तिसरा कसोटी सामना हरल्यानंतर बाबरचे हे विधान जास्तच चर्चेत आले.
पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले, "रमीझ राजा यांनी जाहीरपणे सांगितले आहे की आम्ही कसोटीतही टी२० प्रमाणे खेळू. असे झाले तर टी२०चे फलंदाज जास्त काळ क्रीजवर कसे टिकू शकतील. तसेच अझहर अलीसह अनेक ज्येष्ठ खेळाडूंचा मार्ग बंद होणार का?" यावर उत्तर देताना बाबर म्हणाला, "अजिबात नाही, कोणासाठीही संघाचे मार्ग बंद होणार नाहीत. त्यांच्यासाठी नेहमीच संधी असतील. प्रत्येक गोष्टीचे एक नियोजन असते, एक पद्धत असते. आम्ही त्याच पद्धतीचा अवलंब करत आहोत. एका आठवड्यात किंवा एका दिवसात कोणताही बदल करता येत नाही. त्या गोष्टीला वेळ लागतो, कारण यात मानसिकता बदलायला वेळ लागतो," असे बाबरने सुनावले.
"कसोटीत टी२० खेळायला लागलो तर असे व्हायला नको की आपण वेगळे क्रिकेट खेळल्यावर प्रश्न पडतील की तुम्ही बचावात्मक का खेळत नाही? जर तुम्ही बचावात्मक खेळ केलात, तर तुम्ही आक्रमक का खेळत नाही, असेही विचारलं जाईल. सगळ्यांनाच आनंदी ठेवता येणं शक्य नसतं. सध्या खेळावर आणि सामन्याच्या निकालावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमच्या इच्छेप्रमाणे खेळा," असे बाबरने स्पष्ट केले.