पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि पहिली कसोटी जिंकून त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. दुसऱ्या कसोटीतही संघाने विजयाचा मजबूत पाया रचला आहे. पण, पाकिस्तानी खेळाडूंची अवस्था बिन पगारी, फुल अधिकारी अशी झालेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप त्यांच्यासोबतचा करार केलेला नाही. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतही हे खेळाडू वार्षिक कराराशिवाय खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत यावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
PCB आणि खेळाडू यांच्यातला करार ३० जूनला संपुष्टात आला आणि त्यानंतर बाबर आजम अँड कंपनी श्रीलंकेमध्ये दाखल झाला. खेळाडूंनी करारात काही नवीन मागण्या ठेवल्या आहेत आणि पीसीबी प्रमुख झाका अश्रफ यांच्याशी चर्चा करायची आहे. नजम सेठी पीसीबी प्रमुख होते तेव्हापासून हा मुद्दा प्रलंबित होता आणि खेळाडूंच्या मागणीचा हा चेंडू अश्रफ यांच्या कोर्टात आला आहे. अन्य देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत कमी पैसे मिळत असल्याचे पाकिस्तानी खेळाडूंचे म्हणणे आहे.
खेळाडूंच्या मागण्या
- अन्य क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंच्या समान पगार
- कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स, शिक्षण पॉलिसी
- प्रायोजकांचे प्रकटीकरण, ICC इव्हेंटच्या कमाईतून वाटा
- परदेशी लीगच्या सहभागासाठी एनओसीमध्ये पारदर्शकता
SL vs PAK मालिकेनंतर बाबर आजमसह ६ खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्ये भाग घेतील. LPL 2023 नंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेत आशिया कप 2023 आहे. त्यानंतर संघ पाकिस्तानला परतेल आणि त्यानंतर चर्चा होण्याची शक्यता आहे. PCB 2023 च्या वर्ल्ड कपपूर्वी संघर्ष सोडवण्यास उत्सुक आहे, जेणेकरून संघाला थोडेसे विचलित होऊ नये.