Pakistan vs IPL 2022: पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम याच्यावर जोरदार टीका केली. 'ब्रेंडन मॅक्क्युलम याला फक्त आक्रमक क्रिकेट खेळणंच माहिती आहे आणि तो प्रशिक्षक म्हणून इतरांनाही तसंच क्रिकेट खेळायला शिकवत आहे. सामन्यातील खेळपट्टी, गोलंदाजांचा प्रकार या साऱ्या गोष्टींचा अंदाज न घेता तो खेळाडूंना आक्रमक क्रिकेट खेळण्याचं ट्रेनिंग देतोय जे योग्य नाही. कारण तुमचा कर्णधार हा तुमचा शिपाई नसतो', अशा रोखठोक शब्दांत त्याने मॅक्क्युलमवर निशाणा साधला.
“ब्रेंडन मॅक्क्युलमला कोचिंग देण्यात फार समस्या उद्भवतात. कारण त्याला फक्त आक्रमक क्रिकेटच माहिती आहे. सामन्याचं पिच कसं आहे, हवामान कसं आहे, पिचवर आपण नक्की किती धावा करू शकतो, एखाद्या ठराविक प्रतिस्पर्धी संघासाठी किती धावा पुरेशा ठरतील, याचा तो कधीच शांतपणे विचार करत नाही. निर्भिडपणे क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली तो खेळाडूंना तर्कशून्य पद्धतीचं क्रिकेट खेळायला लावतो’, अशी बोचरी टीका त्याने केली.
तुमचा कर्णधार म्हणून आज्ञांचे पालन करणारा शिपाई नाही!
“तुम्ही तुमच्या खेळाडूंना थोडं स्वातंत्र्य द्यायला हवं. तुम्ही जर एखाद्या खेळाडूला संघाचा कर्णधार करत असाल, तर त्याच्याकडून चुका होतील हे तुम्ही गृहित धरायला हवा. तुमचा कर्णधार हा तुमचा शिपाई नाही. त्यामुळे त्याला केवळ तुमच्या आज्ञांचे पालन करायलाच संघात ठेवलंय अशी धारणा करून घेऊ नका”, असं सलमानने मॅक्क्युलमला सुनावलं.
“PSL मध्ये लाहोर कलंदर्स संघाची अवस्था आम्ही पाहिली आहे. मॅक्क्युलमच्या भाषेत निर्भिडपणे क्रिकेट खेळणं म्हणजे तुमचं डोकं चालवणं बंद करा, सामन्यात काय घडतंय ते न पाहता फक्त फटकेबाजी करत सुटा. तुम्ही १० पैकी ७ गडी गमावले असतील आणि तुमच्याकडे १५ षटकं शिल्लक असतील तरी तो तुम्हाला फटकेबाजी करायलाच सांगतो”, अशा शब्दांत त्याने मॅक्क्युलमच्या कोचिंग स्टाईलबाबत सडेतोड मत मांडलं.