Join us  

"घराणेशाहीमुळेच आझम खान...", ११० किलोच्या खेळाडूला पाकिस्तानी संघात संधी अन्...

पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 1:27 PM

Open in App

Azam Khan News : पाकिस्तानने अमेरिकेविरूद्धचा सामना गमावून टीकाकारांना आमंत्रण दिल्याचे दिसते. प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा खेळत असलेल्या अमेरिकन संघाने शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना अवाक् केले. अशातच शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॅनडाने तगड्या आयर्लंडला पराभवाचे पाणी पाजले. आयर्लंडचा हा अ गटातील दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे Super 8 चे आव्हान संपुष्टात आले आहे. कॅनडाने हा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना पाकिस्तानला गुणतालिकेत खाली ढकलले आहे. कॅनडाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. 

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या सामन्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे आझम खान. पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक आझमचे वजन ११० किलो आहे. त्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. सलामीच्या सामन्यात आझम पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली पण निर्णय त्याच्या बाजूने लागला नाही. आता सोशल मीडियावर चाहते आझमसह त्याच्या वडिलांची फिरकी घेत आहेत. 

सोशल मीडियावर नेटकरी आझम खानवर टीका करत आहेत. घराणेशाहीमुळे त्याला पाकिस्तानी संघात संधी मिळाली असल्याचा दावा अनेकांनी केला. काहींनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवडकर्त्यांना धारेवर धरले. ११० किलो वजन असलेला आझम खान हा यष्टिरक्षक फलंदाज आहे, जो त्याच्या जास्त वजनामुळे ट्रोल होत आहे. तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोईन खानचा मुलगा आहे. याच कारणामुळे चाहत्यांनी आझम आणि वडिलांना घराणेशाहीचा दाखला देत ट्रोल केले. अनेकदा चाहत्यांनी आझमला परची-परची म्हणत ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानचा पुढील सामना रविवारी ९ जून रोजी भारतासोबत आहेत. त्यानंतर पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात ११ तारखेला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघ बलाढ्य भारताविरूद्ध खेळेल. पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेजाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टॅग्स :पाकिस्तानमिम्सट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ऑफ द फिल्ड