PAK vs ENG Test Series : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानच्या सिलेक्टरने राजीनामा दिल्याने एकच चर्चा रंगली आहे. मागील काही कालावधीपासून पाकिस्तान क्रिकेट संघ खराब कामगिरी करत आला आहे. मग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्णधारापासून निवडकर्त्यांची उचलबांगडी केली होती. वन डे विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची गाडी रुळावरुन घसरली. तेव्हापासून शेजाऱ्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानात जाऊन त्यांचा कसोटी मालिकेत २-० असा दारुण पराभव केला. खरे तर आगामी काळात पाकिस्तान आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफने पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे युसूफने राजीनामा दिला. "मी वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून राजीनामा देण्याची घोषणा करत आहे. या अप्रतिम संघाची सेवा करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि मला पाकिस्तान क्रिकेटच्या वाढीसाठी आणि यशात योगदान दिल्याचा अभिमान वाटतो", असे युसूफने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले.
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी करूनही युसूफला पाकिस्तानच्या निवड समितीमध्ये कायम ठेवण्यात आले. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडणाऱ्या समितीमध्ये तो होता. पण, शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा पराभव झाला. या महिन्याच्या सुरुवातीला निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली.
PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.