T20 World Cup 2021: पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं (Pakistan Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत (ICC T20 World Cup) जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. मंगळवारी पाकिस्ताननं नामिबिया विरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्ताननं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ज्यापद्धतीनं कामगिरी केली आहे त्याचं क्रिकेट विश्वात सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. आता नामिबिया विरुद्धच्या सामन्यात पाक संघानं केलेल्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.
नामिबियावर पाकिस्ताननं विजय प्राप्त केला. पण त्यानंतर नामिबियाच्या ड्रेसिंगरुममध्ये पाकिस्तानचे खेळाडू गेले आणि नामिबियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. तसंच त्यांचं तोंड भरुन कौतुक केलं. पाकिस्तान क्रिकेटच्या ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताननं ४५ धावांनी विजय प्राप्त केला. पाकिस्तानच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियानं चांगली झुंज दिली. नामिबियानं २० षटकांच्या अखेरीस ५ बाद १४४ धावा केल्या. नामिबियाच्या याच खेळीचं पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी मोठ्या मनानं कौतुक केलं. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हफीज, हसन अली, फखर जमां आणि शादाब खान यांनी नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जात संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. त्यांनी केलेल्या खेळाचं कौतुक केलं. तसंच भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.