पाकिस्तानमध्ये केव्हा काय होईल, याचा नेम नाही... त्यात पाकिस्तानचं क्रिकेट म्हणजे, तिथे एखाद्या दिवशी काही घडलं नाही, तर लोकांना आश्चर्य वाटतं. आता एक वेगळंच वृत्त समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंना आता चक्क त्यांच्या सैन्यासोबत ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी घोषणा केली आहे की, संपूर्ण संघ २५ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत पाकिस्तानी सैन्यासोबत १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे. पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर हे शिबिर सुरू होईल. खेळाडूंचा फिटनेस अधिक उच्च पातळीवर आणण्याचा त्यांचा उद्देश आहे.
मोहसीन नकवी सर्व खेळाडूंना भेटले आणि म्हणाले की,"मी लाहोरमध्ये सामना पाहत होतो, तेव्हा मला तुमच्यापैकी एकाही खेळाडूचा षटकार स्टँडमध्ये पोहोचला नाही. जेव्हाही असा षटकार मारला गेला, तेव्हा तो परदेशी खेळाडूने मारला होता. मी बोर्डाला प्रत्येक खेळाडूचा फिटनेस सुधारेल अशी योजना तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील.''
नकवी पुढे म्हणाले, "न्यूझीलंडविरुद्ध आता पुढची मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आहे. या व्यग्र वेळापत्रकात सरावाला वेळ केव्हा मिळेल, हा प्रश्न समोर होता. पण, आम्हाला त्यासाठी एक विंडो मिळाली आहे आणि २५ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत काकुल (आर्मी अकादमी) येथे शिबिर आयोजित केले आहे. पाकिस्तान आर्मी खेळाडूंच्या प्रशिक्षणात सहभागी होईल आणि आशा आहे की ते त्यांना मदत करतील.''
नवकी यांनी पाकिस्तानी खेळाडूंना देशासाठी खेळणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असायला हवे हे स्पष्ट केला. ते म्हणाले, "तुम्ही पैसे कमवू नका किंवा त्याचा त्याग करा, असे मी तुम्हाला सांगणार नाही. असे आम्ही करायला तयार नाही. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. वर्षभरापूर्वी मला पंजाबचा मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यामुळे माझ्या व्यवसायात आर्थिक नुकसान झाले. मला ते सोडून द्यावे लागले आणि अनेक अतिरिक्त खर्च करावे लागले. पण माझी इच्छा पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची होती आणि म्हणून मला तो त्याग करावा लागला. ट्वेंटी-२० लीगच्या आधी पाकिस्तान क्रिकेट ही तुमची पहिली प्राथमिकता असायला हवी. जेव्हा पैसा प्राधान्यक्रम बनतो, तेव्हा देश दुसऱ्या क्रमांकावर येतो, हे दुर्दैवी आहे."