क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच हायहोल्टेज ड्रामा ठरली आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसाठी ही लढत एक पर्वणीच असते. दोन्ही संघातील खेळाडूंवरही एक वेगळा दबाव असतो. हा दबाव जो झेलतो तो यशस्वी ठरतो. मागील काही वर्षांत हे यश मिळवण्यात भारतीय संघ आघाडीवर असल्याचे दिसून येते. दुसरीकडे पाकिस्तान संघ हा दबावाखाली नेहमीच मागे पडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाची पाकिस्तान ड्रेसिंग रुममध्ये इतकी दहशत आहे की, तिथं 'टीम इंडिया' हे नाव उच्चारायलाही बंदी घालण्यात आली आहे. ही गोष्ट खुद्द पाकिस्तान 'अ' संघाचा कर्णधार मोहम्मद हारिस याने बोलून दाखवली आहे.
हायहोल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये टीम इंडियाची धास्ती
१९ ऑक्टोबरला भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' हे दोन संघ इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या मॅच आधी पाकिस्तान 'अ' संघाचा कॅप्टन मोहम्मद हारिस याने ड्रेसिंग रुममधील एक खास गोष्ट शेअर केली आहे. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघाचे नाव घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, असे त्याने म्हटले आहे.
पाक ड्रेसिंग रुममध्ये 'टीम इंडिया'च नाव घ्यायलाही आहे बंदी, कारण...
सोशल मीडियावर मोहम्मद हारिस याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यात पाकिस्तानचा कॅप्टन ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघाचं नाव घेण्यावर बंदी का? यावर भाष्य करताना दिसून येते. भारतीय संघाच नाव घेतलं की, खेळाडूंवर एक वेगळाच दबाव निर्माण होतो. भारताशिवाय आम्हाला अन्य संघासोबतही सामने खेळायचे आहे. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये टीम इंडियाचं नाव घेण्यालाच बंदी घालण्यात आली आहे, असे तो म्हणाला आहे.
भारताच्या गटात आहे पाकिस्तान २०२४ च्या हंगामातील पुरुष गटातील इमर्जिंग आशिया चषक स्पर्धा १८ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ओमान, आणि युएई हे संघ 'अ' गटात आहेत. दुसरीकडे अफगानिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका या संघांचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. दोन गटातील आघाडीचे दोन संघ सेमी फायनल खेळतील. २५ ऑक्टोबरला सेमी फायनल सामना रंगणार आहे. २७ ऑक्टोबरला या स्पर्धेतील जेतेपदासाठी फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळेल.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातून खेळणार हे स्टार क्रिकेटर
१९ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या लढतीनंतर भारतीय संघ २१ ऑक्टोबरला युएई, २३ ऑक्टोबरला ओमान विरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. या स्पर्धेत भारतीय 'अ' संघाची कॅप्टन्सी तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. या स्टार क्रिकेटरशिवाय अभिषेक शर्मा, राहुल चाहर यासारखी मंडळीही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणा रआहे.