Join us  

"हे सगळं मुद्दाम केलं जातंय..." विराटचा 'डुप्लिकेट' अहमद शहजादने तडकाफडकी घेतली निवृत्ती

पाकिस्तान मधील क्रिकेट संघांवर केले खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 4:36 PM

Open in App

Ahmed Shahzad Retirement, Pakistan PSL: पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज नवनवीन गोष्टी घडत असतात. क्रिकेटपटू कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नाराज असतात. ठराविक अंतराने क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात वादही घडणे फारच नियमित झाले आहे. अशातच एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचा 'डुप्लिकेट' अशी ओळख असलेल्या अहमद शहजादने अचानक क्रिकेटच्या विशिष्ट फॉमरॅटमधून निवृत्ती घेतली आहे. शहजादने पाकिस्तानच्या T20 लीग-पाकिस्तान सुपर लीगला अलविदा केले आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून त्यांनी ही माहिती दिली. आपण हा निर्णय का घेत आहोत, याचे कारणही त्याने दिले.

अहमद शहजादची स्टाइल विराट कोहलीशी मिळतीजुळती असल्याने त्याची विराटशी तुलना केली जात होती. 2019 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा T20 सामना खेळलेल्या अहमद शहजादने अलीकडेच पाकिस्तानच्या T20 कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्याच सामन्यात 52 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या सामन्यात त्याने क्वेटाविरुद्ध ४४ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. यानंतर त्याने केआर ब्लूजविरुद्ध ५२ चेंडूत ७२ धावा केल्या. यानंतरही PSL च्या ड्राफ्टमध्ये त्याला कोणीही विकत घेतले नाही. त्यानंतर त्याने तडकाफडकी हा निर्णय घेतला.

अहमद शहजादला यावर्षीही पीएसएल ड्राफ्टमध्ये स्थान मिळालेले नाही. यामुळे निराश होऊन त्याने PSLला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अहमद शहजादने लिहिले आहे की, मला यावर्षी पाकिस्तान सुपर लीगला अलविदा म्हणायचे नव्हते. पण आणखी एक पीएसएल ड्राफ्ट माझ्याशिवाय तयार झाला आणि माझा विचार बदलला. आपली निवड का झाली नाही, हे फक्त देवालाच ठाऊक, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे शहजादने सांगितले. त्याने लिहिले की त्याला जाणूनबुजून बाहेर ठेवले जात आहे आणि विकत घेतले जात नाहीत. त्याने लिहिले की फ्रँचायझींनी त्याच्यापेक्षा सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केली पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच हा निवृत्तीचा निर्णय असल्याचे त्याने स्पष्ट केले.

टॅग्स :विराट कोहलीअहमद शहजादपाकिस्तानटी-20 क्रिकेट