मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ( सीसीआय), पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांनी आपापल्या गॅलरीतून पाकिस्तान क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकले. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तान क्रिकेटच्या आठवणींच अजूनही जतन करण्यात आले आहे. Times Now या इंग्रजी वेबसाईटने केलेल्या स्टींग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानचा फोटो झाकत पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला. सीसीआई हा बीसीसीआयचा मान्यताप्राप्त क्लब आहे. सीसीआयच्या या हॉटेलमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बाजुलाच इम्रान खान यांचा वॉलपेपर लावलेला होता. तो झाकण्यात आला आहे.त्यानंतर नवी दिल्लीमध्ये फिरोझशाह कोटला हस्टेडियममध्ये वसिम अक्रम, आसिफ इकबाल, इंजमाम उल हक, शोएब अख्तर, जावेद मियांदाद, वकार युनिस यांच्यासह बारा पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तस्वीरी होत्या आणि त्याही काढण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट संघटनेने घेतला आहे. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळाडूंच्या फोटोजची गॅलरी आहे. या गॅलरीमधून आता पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत. पंजाब येथील मोहालीच्या पीसीए स्टेडियममधूनही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या फोटोंना थारा देण्यात आलेला नाही. पण, बीसीसीआयच्या मुख्यालयात पाकिस्तानी क्रिकेटपटूंची स्वाक्षरी असलेली बॅट व खेळाडूंचे फोटो अजूनही जतन करून ठेवण्यात आले आहेत.दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर तेथेही खेळण्याची गरज नाही अशी मागणी भारतात जोर धरत आहे. त्यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू. जर आम्ही खेळलो नाही, तर पाकिस्तानला गुण मिळतील आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा ते समोर आले, तर त्यांना न खेळताच वर्ल्ड कप मिळेल. याबाबत आम्ही अद्याप आयसीसीसोबत संवाद साधलेला नाही.''