Pakistan cricketer Ayesha Naseem Retirement: पाकिस्तानची युवा स्टार फलंदाज आयशा नसीम हिने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले. 18 वर्षीय आयशाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयशा तिच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे चर्चेत असते. तिची क्रिकेटमधून अचानक निवृत्ती ही धक्कादायक आहे. तिला तिचे उर्वरित आयुष्य, इस्लामनुसार जगायचे आहे आणि म्हणूनच ती क्रिकेट सोडत आहे असे आयशाने सांगितले.
आयशाने तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 369 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 128.12 आहे. आयशाने एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन षटकार आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 षटकारही मारले आहेत. आयशाने 2020 मध्ये पाकिस्तानसाठी पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 15 फेब्रुवारी 2023 रोजी तो शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिचा पहिला एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2023 मध्ये होता.
आयेशाने T20 फॉर्मेटमध्ये स्वतःचे नाव कमावले होते आणि ती पाकिस्तान संघाची महत्त्वाची सदस्य बनली होती. आयशाची अशा प्रकारे क्रिकेटमधून निवृत्ती हा पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे. पाकिस्तानची युवा क्रिकेटर आयशा नसीम हिने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचा अनेक चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. आयशा नसीमने सांगितले की, तिला आता तिचे भावी आयुष्य इस्लामनुसार जगायचे आहे आणि म्हणूनच ती क्रिकेट सोडत आहे. त्यामुळे चाहते या निर्णयावर सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.