Azhar Ali । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने चेस मास्टर म्हणून जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. भारतासाठी धावांचा पाठलाग करताना विराटने खूप धावा केल्या आहेत. तसेच त्याने 46 वन डे शतकांपैकी 22 शतके धावांचा पाठलाग करताना झळकावली आहेत. चेस मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंग कोहलीने अनेक सामन्यांत भारताला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर अझहर अलीने एक खुलासा करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विराट कोहली जर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये बाद झाला नसता तर कदाचित माझे पाकिस्तानमधील घर जाळले असते, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. खरं तर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. या सामन्यात विराट कोहलीला आठव्या चेंडूवर जीवदान मिळाले. पाकिस्तानी क्रिकेटर अझहर अलीने विराट कोहलीचा झेल सोडला होता. त्यामुळे विराटने मोठी खेळी करून पाकिस्तानच्या तोंडचा घास नेला तर काय होईल याची भीती त्याला सतावत होती. मात्र, पुढच्याच चेंडूवर विराट कोहली बाद झाला अन् पाकिस्तानी खेळाडूची काळजी मिटली.
माझे घर उद्ध्वस्त झाले असते - अझहर अलीअलीकडेच पाकिस्तानातील एका शोमध्ये बोलताना अझहर अलीने याबाबत खुलासा केला. विराटबद्दलची भीती सांगताना त्याने म्हटले, "विराट कोहलीचा झेल सोडल्यानंतर मला खूप दडपण जाणवत होते. मी विचार करत होतो की या सामन्यात विराट कोहलीने मोठी धावसंख्या केली तर संपूर्ण देश मला काय म्हणेल?. माझे घर उध्वस्त होईल या विचाराने मी घाबरलो होतो. पण पुढच्याच चेंडूवर विराट बाद झाला अन् मी सुटकेचा नि:श्वास सोडला."
लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडच्या धरतीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 338 धावा केल्या. फखर जमानने पाकिस्तानसाठी 114 धावांची शानदार खेळी केली. 339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 180 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"