Join us  

Shahid Afridi vs Amit Mishra, Kashmir Tweet : "...तरीही काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा थांबणार नाही"; शाहिद आफ्रिदीचं ट्वीट

भारतीय क्रिकेटपटूने आफ्रिदीला दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:54 PM

Open in App

Shahid Afridi vs Amit Mishra, Kashmir Tweet: जम्मू काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने चिथावणीखोर ट्वीट केले. यासिन मलिक हा दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करण्याच्या खटल्यात दोषी आढळल्यामुळे त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी अफ्रिदीने ट्वीट केले. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघना विरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण अशा गोष्टींनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला लढा थांबणार नाही, असं ट्वीट शाहिद आफ्रिदीने केलं.

"काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे हनन केले जात असून त्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, पण भारताने अशा लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवला आहे. आता यासिन मलिक विरोधात खोटे आरोप करून त्याला गप्प केले जात आहे. पण असं असलं तरी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला लढा थांबणार नाही. काश्मीरी नेत्यांविरोधात चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या कारवायांची संयुक्त राष्ट्रांनी नोंद घ्यायला हवी", असे ट्वीट शाहिद आफ्रिदीने केले.

आफ्रिदीच्या ट्वीटवर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने रिप्लाय देत त्याची बोलती बंद केली. 'प्रिय शाहिद आफ्रिदी, यासिन मलिकने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या जन्मतारखेसारखी दिशाभूल करणारी (फसवी) असू शकत नाही', असे उत्तर अमित मिश्राने दिले.

दरम्यान, यासिन मलिक विरुद्ध एनआयए विशेष न्यायालयाने कलम १६ (दहशतवादी कारवाया), कलम १७ (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), कलम १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), कलम २० (दहशतवादी एखाद्या गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) ) आणि कलम १२०बी अंतर्गत म्हणजेच गुन्हेगारी कट, १२४ए म्हणजेच देशद्रोह आणि IPC च्या इतर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासीन मलिकने मागच्या सुनावणीदरम्यान कोर्टासमोर त्याच्यावरील आरोप मान्य केले होते आणि खटला लढण्यास नकार दिला होता.

 

 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीजम्मू-काश्मीरपाकिस्तान
Open in App