Shoaib Malik Match Fixing Rumours: पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे चर्चेत आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमधील एका सामन्यात त्याने तीन नो बॉल टाकल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. फिरकीपटू असतानाही एवढे नो बॉल टाकल्याने त्याला लक्ष्य करण्यात आले. याशिवाय त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. फिक्सिंगच्या आरोपानंतर आता खुद्द मलिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. अलीकडेच मलिकने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.
मलिकनं सांगितलं BPL सोडण्याचं कारण
मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या मलिकने आता स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितले की, फॉर्च्युन बरीशालसोबत माझ्या खेळण्याच्या स्थितीबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. मी या सर्व अफवांचे खंडन करू इच्छितो. कर्णधार तमीम इक्बालशी माझी सखोल चर्चा झाली आहे. सर्व चर्चा झाल्यानंतर मी बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला.
तसेच बिनबुडाच्या आरोपांकडे मी दुर्लक्ष करतो. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्याआधी आणि ती पसरवण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे महत्त्वाचे असते. खोटे बोलल्याने प्रतिष्ठा खराब होऊ शकते आणि अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मी फिक्सिंगच्या आरोंपामुळे बांगलादेशमधून बाहेर पडत नाही हे स्पष्ट करतो. माझ्या संघाला पुढील वाटलाचीसाठी खूप खूप शुभेच्छा, असेही मलिकने सांगितले.
नेमकं झालं काय?
शोएबने बांगलादेश प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सर्व सामने खेळले, पण त्याला साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. मागील आठवड्यात मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १३,००० धावा करून एक मोठा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. फॉर्च्युन बारिशाल आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील सामन्यात त्याने ही कामगिरी केली. २२ जानेवारी रोजी फॉर्च्युन बरीशाल आणि खुलना टायगर्स यांच्यात सामना झाला. शोएब फॉर्च्युन बरीशालकडून खेळत होता. त्याने फक्त एकच षटक टाकले जे संपूर्ण सामन्यातील सर्वात महागडे षटक ठरले. मलिकने या षटकात ३ नो बॉल टाकले आणि १८ धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीच्या प्रयत्नानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला गेला.
Web Title: Pakistan cricketer Shoaib Malik has given reasons for pulling out of the Bangladesh Premier League and has denied allegations of fixing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.