Erin Holland: पाकिस्तानी क्रिकेट संघातील दमदार त्रिकूट बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी हे लवकरच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीगच्या नवीन हंगामासाठी तिन्ही खेळाडू आपली नावे ड्राफ्टमध्ये देऊ शकतात, अशी चर्चा आहे. आता या बातमीवर पाकिस्तानी क्रिकेटरसिक खुश झालं तर नवल नाही. पण या वृत्तामुळे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटर आणि स्पोर्ट्स अँकर एरिन हॉलंड मात्र भलतीच खुश झाल्याचं दिसतंय. आनंदाच्या भरात तिने खास प्रतिक्रियाही दिली आहे.
एरिन हॉलंडने ट्विटमध्ये लिहिले की, BBL च्या सर्व संघांनी या तिघांना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेण्याची तयारी करावी. एरिन हॉलंड ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी आहे. ती पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील अँकरिंग करते. त्यामुळे तिला पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीची माहिती आहे. तसेच, एरिन पाकिस्तानमध्येही खूप लोकप्रिय आहे.
बिग बॅश लीग-2022 साठी ड्राफ्ट्स २८ ऑगस्टला अंतिम केले जाणार आहेत. लीग १३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांची गणना सध्या सर्वोत्कृष्ट टी२० फलंदाजांमध्ये केली जाते. दोन्ही खेळाडू ICC क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे. BBL मध्ये पाकिस्तानचे अनेक खेळाडू सहभागी होत आहेत. परंतु सध्याच्या पाकिस्तानी संघातील मोठी नावे यात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. बाबर, रिझवान यांच्या शिवाय शाहीन शाह आफ्रिदीही ड्राफ्टमध्ये असेल असं सांगितलं जातंय. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार गोलंदाजी करत आहे.