Join us  

पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगार करण्यासाठी फ्रँचायझीकडे पैसेच नाही 

पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईत गेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:38 PM

Open in App

पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईत गेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटलाही मोठा फटका बसताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठ्या इंडियन प्रीमियर लीगला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने पाकिस्तान सुपर लीग सुरू केली खरी, परंतु आता ही लीग बंद झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नसणार आहे. 

पाकिस्तान सुपर लीगचा आठवा सीझन १३ फेब्रुवारीपासून मुलतानमध्ये सुरू होत आहे. लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना डॉलरमध्ये पैसे दिले जातात आणि हा निर्णय आता फ्रँचायझींसाठी डोकेदुखी ठरतोय. पाकिस्तानी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत लक्षणीय अवमूल्यन झाले आहे. सध्या एका अमेरिकन डॉलरची किंमत त्यांच्या २५० रुपयांपेक्षा जास्त आहे.  

PSL फ्रँचायझींनी याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे आणि डॉलरमध्ये पगार करावा लागत असल्यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे मालकांनी व्यवस्थापनाला सांगितले आहे.  टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी फ्रँचायझी खेळाडूंना ७०% पैसे देतात, तर ३०% स्पर्धा संपल्यानंतर दिले जातात. पाकिस्तानी रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम क्रिकेट उद्योगावर होत आहे. परिणामी फ्रँचायझींसाठी पीएसएलचा खर्च वाढत आहे.

पीएसएलमध्ये प्लॅटिनम क्रिकेटपटूंची फी १.३० ते १.७० लाख डॉलर्स, डायमंड ६० ते ८५ हजार डॉलर्स आणि गोल्ड खेळाडूंना ४० ते ५० हजार डॉलर, तर सिल्व्हर खेळाडूंना २५ ते ७० हजार डॉलर्स मिळतात. २०२१मध्ये परदेशी क्रिकेटपटूचे मानधन आणि उत्पादन वगळता इतर पेमेंट रुपयांमध्ये केले होते, परंतु गेल्या वर्षी पीसीबीने पुन्हा सर्व पेमेंट डॉलरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय फ्रँचायझींसाठी मोठी अडचण ठरत आहे. आता या प्रकरणात पीसीबी बदल करतो का आणि तो बदलला तर खेळाडू ते स्वीकारतील का, हे पाहायचे आहे.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App