Pakistan Election Results: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत आजी-माजी क्रिकेटपटूंची इम्रान यांनाच पसंती होती आणि अपेक्षेप्रमाने इम्रानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर इम्रान खानचे विराजमान होणे हे जवळपास निश्चितच आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षितिजावर 1971साली इम्रान नावाचा तारा लुकलुकू लागला. सडपातळ, गोरापान अगदी एखाद्या बॉलिवूड नायकासारखा दिसणा-या इम्रानने अनेक युवतींना घायाळ केले. क्रिकेट मैदानावरील कामगिरीप्रमाणे त्याची मैदानाबाहेरील 'प्रकरणं' गाजली. पण, त्या पलिकडे पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्याने आपली छाप सोडली. पाकिस्तानचा संघ म्हणजे सर्वात किचकट आणि त्यांचे नेतृत्व साभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच. हे आव्हान इम्रानने समर्थपणे पेलले.
(Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!)आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्रारंभ केल्यापासून अकरा वर्षांनंतर 1982 मध्ये इम्रानच्या खांद्यावर कर्णधारपद सोपवण्यात आले. जावेद मियादादने कर्णधारपद सोडल्यानंतर 30 वर्षीय इम्रानकडे ही जबाबदारी येणे साहजिक होते, परंतु पुढील दहा वर्ष ती समर्थपणे पेलणे, ते इम्रानलाच जमले. बदलणा-या परिस्थितीनुसार स्वतःतही बदल करत राहावा लागतो, हे ध्यानात ठेवूनच इम्रान वाटचाल करत राहिला. 1977 ते 1982-83 या कालावधीत जगातील सर्वात धोकादायक जलदगती गोलंदाज म्हणून इम्रान नावारूपाला आला. पण, त्यानंतर त्याच्यातील नेतृत्व कौशल्याची प्रचिती पदोपदी आली.
फलंदाज ही त्याची दुसरी ओळख. पण कोणत्याही क्रमांकावर आणि कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्याची त्याची तयारी असायची. एक उत्तम नेता जसा संघासमोरील अडचणीला सामोरे जाण्यासाठी आघाडीवर असतो, तसाच इम्रान. कर्णधाराची जबाबदारी पार पाडताना त्याने पाकिस्तान संघाचा कायापालट केला. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ जगातील सर्वोत्तम संघांमध्ये गणला गेला. त्यावेळी सर्वोत्तम संघात अव्वल असलेल्या वेस्ट इंडिजला इम्रानच्या संघाने 1-1 अशा बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. संघातील युवा खेळाडूंचा तो खरा मेंटॉर होता. त्याने वासीम अक्रम आणि वकार युनिस यांच्या यशात इम्रानचा मोठा वाटा आहे.
कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुढच्याच वर्षी विश्वचषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली. 1987च्या विश्वचषकातही इम्रानच्या संघाला उपांत्य फेरीची वेस ओलांडला आली नाही. इम्रानने निवृत्ती स्वीकारली, परंतु राष्ट्रपती जनरल जिया उल हक यांच्या आग्रहानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रीय झाला. त्याने 1992चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघबांधणी केली आणि करिष्मा करून दाखवला. पाकिस्तानसाठी तो सोनेरी दिवस होता. भारत आणि इंग्लंड या दादा संघांना त्यांच्याच मायभूमित पराभूत करण्याचा पराक्रम पाकिस्तान संघाने केला तो इम्रानच्या नेतृत्वाखालीच. जगातील वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम कर्णधार, विश्वविजेता आणि आता पुढे पंतप्रधान इम्रानचा हा प्रवास पाकिस्तानच्या युवकांसाठी नक्की प्रेरणादायी आहे.