Join us

घरच्या मैदानात पाक संघाची फजिती! कॅरेबियन संघानं घेतली 'फिरकी'; ३४ वर्षांचा दुष्काळ संपला

पाकिस्तानच्या संघानं पहिला सामना दिमाखात जिंकला, पण शेवटच्या सामन्यात पाहुण्या संघाने बाजी मारत दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:23 IST

Open in App

पाकिस्तान संघानं घरच्या मैदानात कसोटी सामना जिंकण्यासाठी खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटल्याचे पाहायला मिळाले. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी करून सलग तीन कसोटी सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानलावेस्ट इंडिज संघानं पराभवाची धूळ चारली. मुल्तान कसोटी सामन्यात १२० धावांनी विजय मिळवत कॅरेबियन संघानं तब्बल ३४ वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्याचा डावही साधला. पाकिस्तानच्या संघानं पहिला सामना दिमाखात जिंकला, पण शेवटच्या सामन्यात पाहुण्या संघाने बाजी मारत दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहिल्या डावात फक्त १६३ धावा करूनही कॅरेबियन संघानं मिळवली आघाडी

मुल्तान कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात अवघ्या १६३ धावांत ऑलआउट झाला. वेस्ट इंडिज संघाकडून  गुडाकेश मोती याने ५५ धावा तर जोमेल वॉरिकन याने ३६ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून नोमान अली याने ६ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संघ या सामन्यातही आपली पकड मजबूत करेल, असे वाटत होते. पण त्यांचा पहिला डाव १५४ धावांत आटोपला अन् वेस्ट इंडिज संघाला अल्प आघाडी मिळाली. मोहम्मद रिझवानच्या ४९ धावा आणि साउद शकीलनं केलेल्या ३२ धावांच्या खेळीशिवाय अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही.  वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकन याने ४ तर गुडाकेश मोतीनं ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. 

२५४ धावांचा पाठलाग करताना पाकचा खेळ १३३ धावांतच झाला खल्लास

वेस्ट इंडिजच्या संघानं दुसऱ्या डावात २४४ धावा करत यजमान पाकिस्तानसमोर २५४ धावांचे आव्हान ठेवले होते. कॅरेबियन संघाकडून दुसऱ्या डावात ब्रेथवेटनं ५२ धावा केल्या. याशिवाय तेवित इमलाच ३५ धावा आणि आमिर जंगू याने ३० धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून साजिद खान आणि नोमान अली यांनी  प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. २५४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १३३ धावांत आटोपला. जोमेल वॉरिकन याने ५ तर केविन सिंक्लेयरनं ३ आणि गुडाकेश मोतीनं २ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप गुणतालिकेत रसातळाला जाण्याची वेळ

वेस्ट इंडिजच्या संघानं मुल्तानचं मैदान मारत ३४ वर्षांनी पाकिस्तानमध्ये विजय मिळवला. या विजयासह त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये पाकिस्तानला तळागाळात नेऊन सोडलं. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून पाकिस्तान कधीच बाहेर पडला होता. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे ते तिसऱ्या हंगामातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  गुणतालिकेत तळाला गेले. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नामुष्की झाली. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धापाकिस्तानवेस्ट इंडिज