पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानने कर्णधारपदाची खांदेपालट केली. कालच त्यांच्या प्रशिक्षकांनीही राजीनामा दिला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनीही हात वर केले. पाकिस्तान संघासोबत ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर तीनपैकी केवळ एकच कसोटी सामना खेळणारा माजी कर्णधार सर्फराज अहमदने ( Sarfaraz Ahmed ) मोठा निर्णय घेतला आहे. सर्फराज अहमदने त्याच्या कसोटी क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून एक मोठे पाऊल उचलले असून मीडिया रिपोर्ट्सनुसार तो लंडनला शिफ्ट झाला आहे.
२०१७ साली पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार सर्फराज अहमद आता पाकिस्तानला पूर्णपणे सोडून इंग्लंडकडून क्रिकेट खेळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे. सर्फराजला पाकिस्तानमधील क्रिकेटच्या भविष्याबद्दल अनिश्चित आणि निराश वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सोडून लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियात केवळ एक कसोटी सामना खेळण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो काही विशेष करू शकला नाही. आता सर्फराज लंडनला गेल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या पावलावर पाऊल ठेवत तो इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत.
सर्फराज याआधीही यॉर्कशायरकडून खेळला आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)च्या आगामी २०२४ हंगामासाठी सर्फराज पुन्हा पाकिस्तानात परतणार आहे. सर्फराजने पाकिस्तानकडून आतापर्यंत ५४ कसोटी सामन्यांमध्ये ३०३१ धावा केल्या आहेत, तर ११७ वन डे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २३१५ धावा आहेत आणि ६१ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ८१८ धावा आहेत.