Haris Rauf : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आणि त्यांच्या खेळाडूंसोबत सध्यातरी कोणत्याची चांगल्या गोष्टी होताना दिसत नाहीयेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. सध्या हारिस रौफचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका पाकिस्तानी चाहत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानचा क्रिकेट संघ बाहेर पडला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने निराशाजनक कामगिरी केल्याने पाकिस्तानी चाहते संतप्त आहेत. अशातच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ एका चाहत्यासोबत भांडताना दिसला आहे. अमेरिकेत हारिस रौफ रस्त्यात पाकिस्तानी चाहत्यासोबत भांडण करताना दिसत आहे. चाहत्याने चिथावणी दिल्यानंतर रौफ खूपच अस्वस्थ झाला आणि त्याने चाहत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल व्हिडिओमध्ये, हारिस रौफचा एका चाहत्यासोबत वाद होत आहे. यादरम्यान हरिस चांगलाच संतापलेला दिसत आहे. त्याच्यासोबत असेलली एक महिला त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. पण रागात असलेल्या हारिस पायातील चप्पल सोडून त्यांच्या चाहत्याच्या अंगावर धावून जातो. मात्र तिथे असलेल्या इतर लोकांनी त्याला वेळीच अडवलं. त्यामुळे दोघांमध्ये कोणतीही हाणामारी झाली नाही. सुरुवातीला व्हिडिओमध्ये दोघांमध्ये काय बोललं गेलं हे समजलं नाही. मात्र व्हिडीओच्या शेवटी त्यांचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत आहे.
हारिस त्याच्या चाहत्याला तू अपने बाप को गाली देता है... तू अपने बाप को गाली देता है... असं म्हणतो. त्यानंतर पुन्हा हारिस तेरा इंडिया नही है ये असं म्हणाला. हे सगळं सुरु असताना चाहताही मागे हटला नाही आणि त्याने पाकिस्तानी आहे असं म्हटलं. यावर हारिसने, हे तुझ्या वडिलांनी हेच शिकवलं आहे का? पाकिस्तानी असून शिव्या देत आहेस, असं म्हटलं.
दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. ग्रुप स्टेजमधूनच संघाला बाहेर पडावे लागले. तसेच हारिस रौफची कामगिरीही काही खास नव्हती. हारिफने विकेट घेतल्या पण धावाही खूप दिल्या.