PAK vs ENG Test Series : मागील काही कालावधीपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद असल्याचे चित्र आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यामध्ये मतभेद असल्याचे अनेकांनी सांगितले. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी वारंवार या मुद्द्याला हात घालून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लक्ष्य केले. वन डे विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची गाडी रुळावरुन घसरली. तेव्हापासून शेजाऱ्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानात जाऊन त्यांचा कसोटी मालिकेत २-० असा दारुण पराभव केला. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपले मत मांडताना सावध प्रतिक्रिया दिली.
शाहीन म्हणाला की, मला माहिती नाही आजकाल कोणते क्रिकेट जाणकार आणि YouTubers क्रिकेट पाहत असतात. मी चांगली गोलंदाजी करत आहे, बळी घेत आहे आणि माझ्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे. मी सोशल मीडिया पाहत नाही, पण आजकाल लोक YouTube वरुन खूप कमाई करत आहेत. आजकाल कोणतेही कारण नसताना वर्कलोड मॅनेजमेंटची खूप चर्चा केली जाते. वसीम अक्रम आणि वकार युनूस जेव्हा गोलंदाजी करायचे तेव्हा वर्कलोड मॅनेजमेंट नव्हते. खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या खंबीर असायला हवे आणि स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे.
तसेच खेळाडू आणि बोर्डामध्ये एकमत असणे गरजेचे आहे. काही गोष्टींमध्ये सुधारणा व्हायलाच हवी. काही वेळा गैरसमज पसरतात, ज्याचे निराकरण करणे खूप आवश्यक आहे. मला वाटते की, खेळाडूंनी फक्त क्रिकेट खेळावे, बाकी गोष्टींची काळजी क्रिकेट बोर्ड घेईल, असेही शाहीन आफ्रिदीने म्हटले. खरे तर आगामी काळात पाकिस्तान आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक
७-११ ऑक्टोबर, मुल्तान
१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान
२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
Web Title: Pakistan fast bowler Shaheen Shah Afridi's big statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.