Join us  

कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 5:08 PM

Open in App

pakistan cricket team : सततच्या पराभवांमुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बाबर आझम आणि कर्णधार शान मसूदसह इतर खेळाडूंनी रविवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या एक दिवसीय वर्कशॉपला हजेरी लावली. यामाध्यमातून पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करण्यात आली. लाहोरमध्ये हा कॅम्प पार पडला. यामध्ये फखर झमान, मोहम्मद रिझवान, सैय अयुब, सलमान अली अघा, सौद शकील, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी हे खेळाडू दिसले. मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि गॅरी कस्टर्न यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगितले की, आम्ही मागील काळात झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. पाकिस्तान क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी पावले टाकली जात आहेत. समस्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. माजी खेळाडूंना आगामी काळात विचारात घेऊन काही निर्णय घेतले जातील. खरे तर अलीकडेच पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. 

दरम्यान, पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. खरे तर पाकिस्तानला तब्बल १,३०३ दिवसांपासून आपल्या घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. विशेष म्हणजे बांगलादेश नंतर इतर सर्वात जुन्या दहा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी प्रत्येकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे.

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजम