पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम हा जगातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आता वसीम अक्रमने एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला एकेकाळी कोकेनचे व्यसन असल्याचे त्याने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागल्याचे त्याने म्हटले. त्याच वेळी, 2009 मध्ये त्यांची पहिली पत्नी हुमा हिच्या मृत्यूनंतर याचे व्यसन संपल्याचेही त्याने म्हटले आहे. वसीम अक्रम याने त्याचे आत्मचरित्र - सुलतान: अ मेमोयरमध्ये याबाबत अधिक सांगितले आहे.
द टाईम्सने प्रकाशित केलेल्या त्याच्या पुस्तकातील एका अंशात वसीम अक्रमने म्हटलेय की, 'मला पार्टी करायला खूप आवडायचे. दक्षिण आशियामध्ये लोकप्रियतेची संस्कृती उपभोग घेणारी, मोहक आणि भ्रष्ट आहे. एका रात्रीत तुम्ही दहा पार्ट्यांना जाऊ शकता. त्याचा माझ्यावरही परिणाम झाला. सर्वात वाईट म्हणजे मला कोकेनची सवय लागली. मला इंग्लंडमधील एका पार्टीत ते ऑफर करण्यात आले आणि त्यानंतर त्याची सवय लागली. मी सातत्याने कोकेनचा वापर करू लागलो. त्यानंतर मला त्याची अशई सवय लागली की मला काम करण्यासाठी याची गरजच असल्यासारखं वाटू लागले. यामुळे माझे आयुष्य अस्थिर झाले.’
‘म्हणून कराचीला जात नव्हतो’“हुमा कायम एकटी राहायची हे मला माहित होते. आपल्या आई वडील, बहिण भावांच्या जवळ राहावे म्हणून तिला कराचीला जायचे होते. परंतु मला त्याची इच्छा नव्हती. मला काही प्रमाणात कराचीला जाणे आवडायचं. परंतु मी कामामुळे जाऊ शकत नाही असा दिखावा करायचो. याचे खरे कारण इंग्लंडमध्ये पार्टी करणे हे होते,” असेही वसीम अक्रमने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
‘अखेर हुमाला समजले’अखेर तिने मला पकडले. माझ्या खिशात तिला कोकेनचे पॅकेट मिळाले. मला मदतीची गरज असल्याचे तिने सांगितले आणि मीदेखील त्याला होकार दिला. परिस्थिती माझ्या हातून निसटत होती आणि मी त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नव्हतो. ना मला झोप यायची ना मला खायला व्हायचे, असेही त्याने नमूद केले आहे.
“मी एका डॉक्टरकडेही गेलो. परंतु त्यानं उपचार करण्याऐवजी कुटुंबाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मी अनेक समस्यांचा सामना केला. एक असाही काळ आला जेव्हा विभक्त होण्यापर्यंतची वेळ आली. २००९ मध्ये एका आजारामुळे हुमाचे निधन झाले. तिच्या प्रयत्नांमुळेच मी यातून बाहेर पडू शकलो. यानंतर मी मागे वळून पाहिले नाही,” असे वसीम अक्रमने म्हटले. हुमाच्या मृत्यूनंतर वसीम अक्रमने दुसरा विवाह केला.