लाहोर : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटपटू इंझमाम उल हक याला सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर इंझमामची प्रकृती स्थिर असून, त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.इंझमामला काही दिवसांपासून छातीत कळा येत होत्या. प्राथमिक चाचण्यांचे सर्व अहवाल सामान्य आले. मात्र, सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे निष्पन्न झाल्याचे वृत्तात म्हटले आहे.
इंझमामची प्रकृती आता स्थिर आहे. ५१ वर्षीय इंझमाम हा पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३७८ वन डेत ११ हजार ७०१ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानी आहे. कसोटीमध्ये १२० सामन्यांमध्ये त्याने ८ हजार ८२९ धावा केल्या आहेत. तो पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
सचिनने केले ट्विट‘इंझमाम लवकर बरा व्हावा, यासाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही मैदानावर नेहमीच प्रतिस्पर्धी आणि झुंजारवृत्तीचे असताना शांतचित्त राहिलात. या परिस्थितीतून आणखी भक्कम होऊन बाहेर पडाल, अशी आशा आहे.’