Yashasvi Jaiswal, IND vs BAN Test: टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. बांगलादेशच्या संघाने कसोटीची सुरुवात धडाकेबाज केली होती. पण रवीचंद्रन अश्विनच्या शतकानंतर संपूर्ण सामनाच पालटला. पहिल्या डावात अश्विनने ११३ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्यानंतर बांगलादेशच्या डावात कोणीही अर्धशतकदेखील ठोकू शकले नाहीत. भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने नाबाद ११९ धावा केल्या. तर रिषभ पंतने १०९ धावांची खेळी केली. भारताकडून तीन शतके ठोकण्यात आली. त्याशिवाय, यशस्वी जैस्वालने पहिल्या डावातील अर्धशतकासह एकूण ६६ धावा केल्या. त्याच्या या खेळीवरून पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू बासित अलीने मत मांडले.
"यशस्वी जैस्वाल दोनही डावात चांगले फटके खेळत होता. माझ्यासाठी यशस्वी जैस्वाल हाच मॅचचा हिरो आहे. तो माझा आवडता खेळाडू आहे. पण मोठी खेळी कशी करायची हे त्याने आता शिकायला हवं. आता नाही शिकला, तर मग तो नंतर कधी शिकणार? तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहात. तुमची फलंदाजी आणि फटकेबाजीही चांगल्या पद्धतीने होत आहे. अशा वेळीच तुम्ही मोठी खेळी करणे अपेक्षित असते. चांगल्या स्थितीत असताना खराब फटके मारून बाद होणे याला काहीच अर्थ नाही. भारतासाठी सध्या हाच सर्वाधिक चिंतेचा विषय आहे," असे बासित अली म्हणाला.
पाकच्या माजी क्रिकेटरची PCB ला चपराक
पाकिस्तानमधील ऐतिहासिक विजयासह अगदी तोऱ्यात भारतीय दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशचा टीम इंडियासमोर अजिबात निभाव लागला नाही. या निकालानंतर कामरान अकमल याने पाकिस्तानच्या संघाच्या पराभवाचे खापर थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) फोडले. एवढेच नाहीतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून काहीतरी शिका, असा सल्लाही त्याने आपल्या बोर्डाला दिला आहे. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सर्वकाही ठिक असतं, तर पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान झाले नसते, असे कामरान अकमल याने म्हटले आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा बुक्का पाडल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण तापलं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.