IND vs PAK, IPL 2022: भारतात सध्या IPL चा १५वा हंगाम सुरू आहे. स्पर्धेतील अर्ध्याहून जास्त सामने खेळून झाले आहेत. पण अद्याप टॉप ४ संघ कोणते असतील याबद्दलचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. यावरूनच IPL आणि भारतीय क्रिकेटची संघटना बांधणी किती भक्कम आहे, याचा अंदाज येतो. IPL ने टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर नवे आणि प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, टी नटराजन यांसारखे वेगवान गोलंदाज टीम इंडियाला IPLमधूनच मिळाले. असे असताना, पाकिस्तानी खेळाडू IPL ला नावं ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत. या दरम्यान, IPL मुळे भारतात कुणीही उठतं अन् हातात शूज घेऊन फास्ट बॉलर बनायला जातं, असं विधान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने केले आहे.
भारतातील क्रिकेटची संघटना बांधणी खूप मजबूत आहे. रणजी करंडक स्पर्धा हा त्यांचा पाया आहे. मूळ गोष्टींकडे भारत कधीही दुर्लक्ष करत नाही. पण फ्रँचायसी क्रिकेटमुळे आपल्याला आवडता खेळाडू तुम्ही विकत घेऊ शकता. त्यासाठी हवे तेवढे पैस मोजण्यास संघ तयार असतात. कोणासाठी किती पैसे मोजले याचा हिशेब त्यांना कोणालाही द्यावा लागत नाही. त्यामुळे हल्ली आधी क्लब क्रिकेट, मग जिल्हास्तरीय क्रिकेट आणि मग टीम इंडिया असं घडत नाही. त्यामुळेच कुणीही उठतं आणि शूज हातात घेऊन फ्रँचायजींच्या कँपमध्ये फास्ट बॉलर बनण्यासाठी पोहोचतं", असं विधान पाकिस्तानच्या अकीब जावेदने केले.
"IPL मुळे भारतीय खेळाडूंना कमी वेळात भरपूर पैसे मिळतात. जास्त पैसा आला की खेळाडूंकडे असलेले पर्याय वाढतात. IPL मुळे खेळाडूंना जास्त गोष्टी मिळू लागल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबतच लोकांचे चैनीचं प्रमाणही वाढलं आहे. ४ षटकं टाकण्याचे करोडो रुपये मिळू लागल्याने नवे खेळाडू झटपट पैसे देणाऱ्या स्पर्धांकडे जास्त आकर्षित होऊ लागले आहेत", असेही जावेद म्हणाला.