इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. यशस्वीने दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा केल्या. तर सर्फराज खानने नाबाद ६८ धावा केल्या. यशस्वीने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले आहे. त्याचवेळी सर्फराजने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावण्याची किमया साधली. या सामन्यातून भारतीय संघासह यशस्वीने षटकारांचा खास विक्रम केला.
सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत विनोद कांबळी आणि विराट कोहलीची बरोबरी केली. कांबळी यांनी १९९२-९३ मध्ये ही कामगिरी केली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांनी इंग्लंडविरुद्ध २२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावांची खेळी खेळली. त्यांच्यानंतर कोहलीचा नंबर लागतो. विराटने २०१७-१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात २१३ आणि दिल्लीत २४३ धावा केल्या होत्या. आता यशस्वी त्यांच्या यादीत सामील झाला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध २०९ धावा केल्या आणि राजकोटमध्ये २१४ नाबाद धावा केल्या.
वसीम अक्रमच्या विक्रमाशी बरोबरी दरम्यान, यशस्वी जैस्वालने आपल्या एका डावात १२ षटकार ठोकले. कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने याबाबतीत पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमच्या २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. अक्रमने १९९६ मध्ये मायदेशात झिम्बाब्वेविरुद्ध १२ षटकार ठोकले होते. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, न्यूझीलंडचा नॅथन ॲस्टल, ब्रँडन मॅक्युलम (दोनदा), इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि श्रीलंकेचा कुसल मेंडिस यांनी एका डावात प्रत्येकी ११ षटकार ठोकले आहेत. मात्र, आता यशस्वी जैस्वालने १२ षटकार ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली.
यशस्वी जैस्वालच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जैस्वालने वसीम अक्रमच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर अक्रमने यावर भाष्य केले आहे. पाकिस्तानातील 'ए स्पोर्ट्स'वर पाकिस्तान सुपर लीगचे विश्लेषण करत असलेला अक्रम म्हणाला की, यशस्वी जैस्वालने माझ्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याने एकाच डावात १२ षटकार ठोकले. पण, अद्याप तो माझा विक्रम मोडू शकलेला नाही.