नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. आगामी वन डे विश्वचषकापूर्वी तो पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा दुसऱ्यांदा जावई झाला. शाहीनने शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले आहे. माजी क्रिकेटर सईद अन्वर आणि पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम यांसारखे खास पाहुणे देखील या लग्नाला उपस्थित होते. शाहीनचा सासरा शाहिद आफ्रिदीने एक फोटो पोस्ट करून जोडप्याचे अभिनंदन केले.
दरम्यान, शाहीन आफ्रिदीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये अंशाशी लग्न केले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांचे अनेक नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. याच कारणामुळे शाहीनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.
शाहिद आफ्रिदीने शाहीन आणि त्याच्या मुलीचे अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. याशिवाय आफ्रिदीने जावई आणि लेकीसाठी खास चारोळ्या लिहिल्या आहेत. यासोबतच शाहिद आफ्रिदीने शाहीन आणि मुलगी अंशासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
बाबर आझमची उपस्थिती
शाहीन आफ्रिदीच्या दुसऱ्या लग्नाला अनेक खास पाहुणे उपस्थित होते. त्यात दिग्गज क्रिकेटपटू सईद अन्वरचाही समावेश आहे. सईद अन्वरचे स्वागत खुद्द शाहिद आफ्रिदीने केले. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमही लग्नाला आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये तो शाहिद आफ्रिदीसोबत दिसत आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. शाहीन आफ्रिदी विश्वचषक खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आशिया चषकातही त्याची कामगिरी उत्कृष्ट होती.
Web Title: Pakistan former player Shahid Afridi pens emotional note on his daughter's wedding with Shaheen Shah Afridi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.