मुंबई- अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं तब्बल 203 धावांनी धुव्वा उडवला आणि अंतिम सामन्यात दणक्यात प्रवेश केला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र अवघ्या 69 धावांतच गारद झाला. अंतिम सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद शतक (102)आणि कर्णधार पृथ्वी शॉ (42) व मनज्योत कालरा (47) यांच्यातील दणदणीत सलामी भागीदारी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पाकिस्तानचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. त्यांच्याकडून रोहेल नजीर याने सर्वाधिक 18 धावा केल्या. तर साद खान याने 15 आणि मोहम्मद मूसा याने 11 धावांचं योगदान दिलं.
भारताकडून झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून पाकिस्तानी संघाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वात खेळणा-या भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर भारताला खूप ट्रोल केलं होतं. तेव्हापासून जेव्हाकधी संधी असेल दोन्ही संघाचे चाहते ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हॉकीपासून अंधविश्वचषक ते आज झालेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी संघाला पराभव पत्कारावा लागला आणि भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दरवेळेस त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. असंच चित्र आज देखील पाहायला मिळालं.
आज झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा एकही खेळाडू 18 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. ''19 वर्षांखालील पाकिस्तानच्या संघात एकानेही 19 धावा केल्या नाहीत, त्यांना समजवा की येथे वयाची मर्यादा आहे पण धावा काढायची मर्यादा नाही'' अशा आशयाचे एकाहून एक ट्विट करून भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना अक्षरशः नामोहरम करून सोडले.
Web Title: pakistan get trolled after getting thrashed by team india in under 19 world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.