ICC Cricket World Cup 2023 - भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) रोज नवनवीन नाटकं केली. BCCIच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेसोबत विभागावे लागले. त्यानंतर PCB ने भारतातील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सहभागाचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल अशी भूमिका घेतली. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाला भारत दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने ११ सदस्यीय समिती नेमली होती आणि आज त्याचा फैसला झाला आहे. पाकिस्तान सरकारने आणि PCB ने आयसीसीकडे पाकिस्तान संघाच्या सुरक्षेची लेखी हमी आयसीसीकडे मागितली होती.
पाकिस्तान सरकारने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला पाठवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. "क्रीडा आणि राजकारण यांच्यात सरमिसळ करू नये , असे पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी आपला क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे," असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
"पाकिस्तानचा असा विश्वास आहे की भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांची स्थिती त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा-संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गात उभी राहू नये. पाकिस्तानचा निर्णय भारताच्या अविचारी वृत्तीच्या विरूद्ध त्याची रचनात्मक आणि जबाबदार दृष्टीकोन दर्शवितो, कारण त्यांनी आपला क्रिकेट संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला होता,''असेही पुढे म्हटले आहे.
मात्र परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "पाकिस्तानला मात्र आपल्या क्रिकेट संघाच्या सुरक्षेबाबत सखोल चिंता आहे. आम्ही या चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत भेटीदरम्यान त्यांची संपूर्ण सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, " असेही म्हटले आहे.