Join us  

Shoaib Akhtar: "त्यांना याबाबत कल्पना नाही", पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने इंजमाम आणि अख्तरला फटकारले 

पाकिस्तानला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 3:25 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. 23 धावांनी झालेला पराभव पाकिस्तानी संघाच्या फारच जिव्हारी लागला. सलामीवीर मोहम्मद रिझवानने केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानला 100 धावांचा आकडा गाठता आला होता. मात्र तरीदेखील पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरने रिझवानच्या खेळीवर टीका केली होती. याच टीकेवरून आता पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि अख्तर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानसमोर 171 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानकडून एकट्या मोहम्मद रिझवानने झुंज देत अर्धशतकी खेळी केली. रिझवानने 49 चेंडूंत 55 धावा केल्यामुळे शोएब अख्तरने त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. याच प्रश्नांवरून सकलेन मुश्ताक यांनी इंजमाम उल-हक आणि अख्तरला फटकारले आहे. "रिझवान 50 चेंडूंत 50 धावा करतोय त्याचा पाकिस्तानच्या संघाला फायदा होणार नाही", अख्तरने सामना झाल्यानंतर हे ट्विट केले होते. 

अख्तर, इजमामला फटकारले सकलेन मुश्ताक यांनी त्यांच्या युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओतून म्हटले, "जर 70 धावा आणखी धिम्या गतीने झाल्या असत्या तर पाकिस्तानला केवळ 140 धावा कराव्या लागल्या असत्या. ज्याचा पाठलाग पाकिस्तानच्या फलंदाजांना करता आला असता." तसेच पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकांनी रिझवानची पाठराखण केली आणि माजी खेळाडूंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना म्हटले की बाहेरून टिप्पणी करणे सोपे आहे.

"ही त्यांची चूक नाही. त्यांनी सामन्याचा निकाल आणि स्कोअरकार्ड पाहिले आणि त्यांच्या टिप्पण्या केल्या. ड्रेसिंग रूममध्ये काय चालले आहे, खेळाडूंना त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल आणि त्यांना झालेल्या दुखापतींबद्दल काय वाटते याची त्यांना अजिबात कल्पना नाही", अशा शब्दांत सकलेन मुश्ताक यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानश्रीलंकाशोएब अख्तर
Open in App