Pakistan vs Bangladesh: हॅमिल्टनच्या सिदान पार्कमध्ये बांगलादेशी खेळाडूंनी इतिहास रचला. महिला विश्वचषक (Womens World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशनेपाकिस्तानचा ९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ७ गडी गमावून २३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण १३ चेंडूत त्यांचे पाच बळी गेले अन् अखेर त्यांना स्पर्धेतील सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला.
बांगलादेशच्या विजयात फातिमा खातूनचा मोठा वाटा होता. फातिमाला फलंदाजीत खातंही उघडता आलं नाही. पण गोलंदाजीत तिने हिशेब चुकता केला. बांगलादेशकडून तिने ३८ धावांत महत्त्वाचे ३ बळी घेत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशसाठी हा विजय खूपच खास ठरला. या सामन्यात बांगलादेशचा पराभव निश्चित दिसत होता. पाकिस्तानची धावसंख्या २ बाद १८३ होती. पण त्यानंतर अवघ्या ५ धावांत ५ विकेट्स गमावल्याने सामना फिरला आणि त्यांना २१५ धावाच करता आल्या.
बांगलादेश महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झाला आणि आज त्यांनी स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. गेल्या दोन सामन्यांत त्यांना वाईट रीतीने पराभूत व्हावं लागलं होतं. विशेष म्हणजे, बांगलादेशच्या पुरुष संघाने १९९९ मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. त्यावेळी त्यांनीदेखील आपल्या तिसऱ्या सामन्यात पहिला विजय नोंदवला होता. पुरुष संघाने तेव्हा स्कॉटलंडचा २२ धावांनी पराभव केला होता.
Web Title: Pakistan innings tumbles as they lost 5 wickets in 13 balls vs Bangladesh registers first win in odi womens world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.