नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना 12 ऑक्टोबर रोजी यजमान न्यूझीलंड आणि बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंडने 48 धावांनी मोठा विजय मिळवून बांगलादेशला चितपट केले. मात्र याच सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे किवी संघाची तुलना पाकिस्तानसोबत केली जात आहे. खरं तर किवी संघाची फिल्डिंग पाकिस्तानी संघासारखी गचाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या संघाने एक सोपा झेल सोडला होता, ज्याचा व्हिडीओ व्हायरल करून चाहते पाकिस्तानसह किवी संघाची खिल्ली उडवत आहेत.
4 फिल्डर असूनही सुटला झेलहा सर्व प्रकार बांगलादेशचा डाव सुरू असतानाचा आहे. बांगलादेशच्या फलंदाजीतील पहिल्याच षटकांत आणि ट्रेंट बोल्टच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर फलंदाजाने हवेत चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क ठीक न झाल्यामुळे चेंडू जास्त लांब न जाता खेळपट्टीच्या आसपासच्या भागांत हवेत गेला. चेंडू हवेत उडताच किवी संघातील चार खेळाडू त्याच्या खाली आले पण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. यादरम्यान झेलसाठी कॉन्वेने कॉल केला मात्र जेव्हा चेंडू खाली पडला तेव्हा तो खूप दूर राहिला. यामुळेच चेंडूखाली चार खेळाडू उभे असतानाही एक सोपा झेल सुटला.
चाहत्यांनी पाकिस्तानला केले ट्रोल या घटनेचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. चाहत्यांनी व्हिडीओला रिट्विट करून पाकिस्तानचा माजी खेळाडू सईद अजमलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर एका युजरने पाकिस्तानला ट्रोल करताना लिहले, "पाकिस्तानसोबत ट्राय सीरीज खेळण्याचा हा दुष्परिणाम आहे."
पाकिस्तान-न्यूझीलंडमध्ये होणार फायनललक्षणीय बाब म्हणजे बांगलादेशचा संघ ट्राय सीरिजमधून बाहेर झाला आहे. खरं तर या मालिकेत बांगलादेशच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. बांगलादेशला त्यांच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता मालिकेतील फायनलचा सामना पाकिस्तान आणि यजमान न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.