किंग्स्टन : डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजचा १०९ धावांनी पराभव करीत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली. आफ्रिदीने दुसऱ्या डावात ४३ धावात चार आणि एकूण ९४ धावात दहा गडी बाद केले.
३२९ धावांचा पाठलाग करणारा विंडीज संघ दुसऱ्या डावात २१९ धावात बाद झाला. शाहीनशिवाय नौमान अली याने तीन तसेच हसन अलीने दोन गडी बाद केले.पहिल्या डावात ५१ धावात सहा गडी बाद करणाऱ्या शाहीनने चहापानानंतर जोशुआ डिसिल्व्हाला बाद करीत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. २१ वर्षांच्या शाहीनने मालिकेत ११.२८ च्या सरासरीने १८ बळी घेतले.
विंडीजने एक बाद ४९ वरून खेळ सुरू करीत पहिल्या सत्रात चार फलंदाज गमावले. पावसाने हजेरी लावली त्यावेळी त्यांची अवस्था ७ बाद १५९ अशी झाली, शिवाय ४० षटकांचा खेळ शिल्लक होता. खेळ सुरू होताच शाहीनने तीनपैकी दोन गडी बाद केले. विंडीजने पहिली कसोटी एक गडी राखून जिंकली होती. मात्र येथे कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यासोबतच शाहीन याने आयसीसी रँकिंगम्ध्ये मोठी उसळी घेतली आहे. तो रँकिंगमध्ये आठव्या स्थानी आहे.
संक्षिप्त धावफलकपाकिस्तान : पहिला डाव ९ बाद ३०२ वर घोषित, वेस्ट इंडिज पहिला डाव : सर्वबाद १५०, पाकिस्तान दुसरा डाव : ६ बाद १७६ वर घोषित. वेस्ट इंडिज दुसरा डाव : (विजयी लक्ष्य ३२९ धावा) सर्वबाद २१९ धावा. सामनावीर आणि मालिकावीर : शाहीन आफ्रिदी.