पाकिस्तानी संघ वन डे विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर शेजारील देशातील माजी क्रिकेटपटू आपल्या संघावर टीका करत आहेत. तसेच बाबर आझमला कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला देत आहेत. खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद रंगला आहे. कर्णधार बाबर आझमसह सर्व पाकिस्तानी संघ माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना एका शोमध्ये पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने एक लाजिरवाणे विधान केले. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा दाखला देत त्याने आपल्या संघाला घरचा आहेर दिला. या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदी, मिस्बाह-उल-हक आणि उमर गुल यांसारखे माजी खेळाडू देखील उपस्थित होते. रज्जाकने जेव्हा वक्तव्य केले तेव्हा शाहिद आफ्रिदी हसताना दिसला मात्र त्यानंतर त्याने स्पष्टीकरण देताना रज्जाकला याप्रकरणी माफी मागण्यास सांगितले.
अब्दुल रज्जाकने म्हटले होते, "चांगली कामगिरी करण्यासाठी संघाचा हेतू योग्य असला पाहिजे. जर मी ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले आणि चांगली मुले व्हावीत असा विचार केला तर तसे होणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू आधी बरोबर सेट करावा लागेल." रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत होता.
शाहिद आफ्रिदीने दिले स्पष्टीकरणअब्दुल रज्जाकने ऐश्वर्या रायबद्दल विधान केल्यानंतर तिथे उपस्थित असलेला आफ्रिदी हसला होता. याचा दाखला देत चाहत्यांसह नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला लक्ष्य केले. यावर बोलताना आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा रज्जाक बोलत होता तेव्हा मला काहीच कळले नव्हते. मी केवळ कोणत्याही कारणाशिवाय हसत होतो, कारण रज्जाक नेहमी काही ना काही विनोद करत असतो. पण, जेव्हा मी ती क्लिप ऐकली तेव्हा लगेच रज्जाकला मेसेज करून याप्रकरणी माफी मागायला सांगायला हवी असा विचार केला. ही खरोखरच चुकीची गोष्ट असल्याचेही आफ्रिदीने सांगितले.
पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आले. तर उर्वरित पाच सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान २०२३ च्या विश्वचषकापूर्वी उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु बाबर आझम अँड कंपनीने विश्वचषकात ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.