पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) सध्या आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरून चिंताग्रस्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानं त्यांचं टेंशन अजून वाढलं आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या वादात आशिया क्रिकेट परीषदेची गोची झालेली आहे. त्यामुळे यंदाचा आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार की नाही, यावर संभ्रमाचे वातावरण आहे. टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आशिया कप खेळवण्यात येईल.
यंदाचं वर्ष हे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्या स्पर्धेपूर्वी आशिया कप ट्वेंटी-20 स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळे आशिया कप हा आशियाई खंडातील संघाना सरावाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढली आहे. असे असताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीसीबीनं त्यांच्या माजी खेळाडूकडून कोट्यवधींचं कर्ज घेतलं आहे. पाकचा यशस्वी कसोटी फलंदाजानं केलेल्या दाव्यानं नेटिझन्सच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमीच काहीना काहीतरी घडत असते. पाकिस्तानचा माजी कसोटीपटू युनिस खाननं धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे आपले 4 ते 6 कोटी रुपये थकवल्याचा दावा युनिसनं केला आहे. हे पैसे पीसीबीकडून कधी मागितले नाही. आपल्याला पीसीबीसोबत काम करायचे आहे, असंही युनिसनं सांगितलं. तो म्हणाला,''पीसीबीनं माझे 4 ते 6 कोटी रुपये थकवले आहेत, परंतु मी त्यांच्याकडे ते कधी मागितले नाही. पैसा हा माझ्यासाठी मुद्दा नाही. पैशांच्या मागे पळणाऱ्यांपैकी मी नाही. मला नेहमीच पीसीबीसोबत कायम करायचे आहे. मी पाकिस्तान आणि पीसीबीसाठी 17-18 वर्ष काम करू शकतो.''
पाकिस्तानकडून कसोटीत सर्वाधिक धावांचा ( 10099) विक्रमही युनिसच्याच नावावर आहे. त्यानं वन डेत 7249, तर ट्वेंटी-20त 442 धावा केल्या आहेत.