Asia Cup 2022, Pakistan: आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करता आले नाही आणि संपूर्ण संघ १४७ धावांवर गारद झाला. या पराभवाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. पाकिस्तानने २०१२ मध्ये शेवटचा आशिया चषक जिंकला होता.
जेतेपद पटकावल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्याच वेळी अफगाणिस्तानमध्येहीश्रीलंका संघाच्या विजयावर लोकांनी खूप आनंद साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काबुल शहरातील असून, यामध्ये अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानच्या पराभवावर नाचत असून फटाके वाजवतानाही दिसले.
दरम्यान, विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका म्हणाला, "गेल्या वर्षीही आम्ही क्वालिफायर खेळलो होतो. तीन-चार वर्षांपूर्वी आलेला हा सेटअप आहे. गेली दोन वर्षे आमच्यासाठी खरोखरच चांगली होती आणि आशिया चषक जिंकल्याने आम्हाला विश्वचषकासाठी याची मदत होईल. या विजयामुळे विश्वचषक पात्रता फेरीतही मदत होईल कारण आम्ही मुख्य स्पर्धा होण्यापूर्वी त्या परिस्थितीत खेळणार आहोत. त्यामुळे आमच्यासाठी ते खरोखरच चांगले असेल."
लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद होतो- राजपक्षे
दरम्यान, सामना जिंकणारा डाव खेळणारा भानुका राजपक्षे म्हणाला, "आम्ही सर्वांनी काही दशकांपूर्वी संपूर्ण जगाला दाखवून दिले होते की आमच्या आक्रमकता काय घडवू शकते. आणि आम्हाला त्या क्षणांची आठवण करून द्यायची होती. मला वाटते की, एक युनिट म्हणून आम्ही सध्या खूप चांगले काम करत आहोत. ही गती आम्हाला विश्वचषकातही कायम ठेवायची आहे. एक राष्ट्र म्हणून माझ्या मते हा मोठा विजय आहे. श्रीलंकेसाठी हा कठीण काळ आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणताना आम्हाला खूप आनंद होतो.
Web Title: Pakistan lost in Asia Cup 2022 Final Afghanistan celebrates with fireworks crackers dance Video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.