Bangladesh vs Pakistan, Big Upsets in Test Cricket: पाकिस्तान संघाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर संघाने लाज राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर बांगलादेशने घरच्या मैदानावर पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. बांगलादेशच्या या मालिका विजयाची क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचे आणखी एक कारण म्हणजे बांगलादेशची आगामी कसोटी मालिका टीम इंडियाशी आहे. बांगलादेशने धक्का दिलेला पाकिस्तान हा पहिला संघ नाही. याआधीही बांगलादेशने काही संघांना अनपेक्षित धक्के दिले आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल.
पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय
बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. पाकिस्तान संघ आपल्याच घरात पराभूत झाला आहे. पहिल्या कसोटीत बांगलादेशने पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव करत सोशल मीडियावर वाहवा मिळवली होती. यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाला बांगलादेशकडून पुन्हा एकदा ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा २-० असा पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आपला दावा सांगितला आहे.
बांगलादेशने वेस्ट इंडिजचाही केला होता पराभव
बांगलादेश संघाने २००० साली पहिल्या कसोटीच्या माध्यमातून भारताविरुद्ध सुरुवात केली. त्यात या संघाला टीम इंडियाकडून १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण नंतर बांगलादेशने वेस्ट इंडिजला दणका दिला आहे. २००९ साली बांगलादेशने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव करून विजय मिळवला होता. यानंतर २०१८-१९ मध्येही त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते.
न्यूझीलंड, झिम्बाब्वे, आयर्लंडला दिली कडवी झुंज
केवळ वेस्ट इंडिजच नाही, तर बांगलादेशचा संघ झिम्बाब्वे आणि आयर्लंडसारख्या संघांविरुद्धच्या कसोटीतही पुढे राहिला. तसेच न्यूझीलंडसारख्या संघालाही बांगलादेशने चांगलेच झुंजवले. बांगलादेशने २०२३ मध्ये न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित ठेवली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरोधात मालिका अनिर्णित ठेवणे हा मानसिक विजयच मानला जातो.
टीम इंडियाला इशारा
पाकिस्तानला त्यांच्यात भूमीत हरवल्यानंतर बांगलादेशने टीम इंडियाला इशारा दिला आहे. १९ सप्टेंबर रोजी बांगलादेशचा संघ २ कसोटींच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे.